नवरा, बायको, पोर आणि HIV

By Dr. Swapnil Chaudhari 25th May 2018 | 8min Read

“स्वप्नील… हातात ग्लोवस घालशील बर आणि मास्क घे त्या बॉक्समधून, ते नवीन ऍडमिशन HIV पॉझीटीव आहे.
मी “हो सिस्टर”
म्हणून ग्लोवस घालायला वळलो तेवढ्यात पुन्हा सिस्टरचा आवाज कानावर आला,
“आणि ऐक ब्लड सॅम्पल पाठवायच आहे त्यांच, पण ब्लड ग्रुपसाठीच्या  बल्ब वर urgent लिहुन पाठव आठवणीनं.”
मी हो म्हटलं आणि मास्क लावून त्या बेडजवळ गेलो, काळजीपूर्वक त्यांचं ब्लड सॅम्पल घेऊन आलो, इकडे सगळे फॉर्म भरून तिच्या नातेवाईकांकडे ते urgent होत म्हणून सॅम्पल देन्यासाठी आवाज दिला, पण कोणी येईनाच म्हणून बेडजवळ पुन्हा गेलो आणि विचारलं, सोबत कोण आहे? तर त्या बाईसोबत असलेलं ५/६ वर्षाच्या पोरानी ऊत्तर दिलं, “पप्पा हाये सोबत पण बाहेर गेले हायेत.” बरं मी त्या बाईला सांगितलं की तुमचा नवरा आला की लगेच माझ्याकडे पाठवा, तुमचं रक्त तपासणीला पाठवायचयं. तिने होकार दिला व मी पुन्हा माझ्या जागेवर येऊन माझी माझी काम करू लागलो, एक तास झाला दीड तास झाला ते सॅम्पल घ्यायला कुणी येईना म्हणून मीच तिकडं जाऊन पाहिलं तर ती बाई झोपली होती, शेजारी लेकरू बसलेलं होतं, झोपलेल्या आईकडे निर्विकारपणे बघत बसलेलं होतं. मी पुन्हा माझ्या खुर्चीवर आलो आणि मावशीला सांगितलं की;
“मावशी हे सॅम्पल घेऊन जा
त्या बाईचा नवरा काही येत नाही वाटतं, आणि ब्लड ग्रुप urgent करून आणा या सॅम्पलचा, तिला रक्त लावावे लागेल बहुतेक.” मावशी गेल्या लॅब मध्ये आणि मी पुन्हा जाऊन माझ्या खुर्चीवर बसलो पण बसल्या बसल्या माझ्या डोळयांसमोर ते ५/६ वर्षांचं लेकरूच दिसत होतं, आईच्या बाजुला बसलेलं.

तेवढ्यात “डॉक्टर डॉक्टर ” असा आवाज कानावर आला आणि मी भानावर आलो. सिस्टर आवाज देत होत्या, त्यांनी सांगितल की;
“तिचा नवरा आलाय त्याच्याकडे दे ते सॅम्पल”,
मी म्हटलं
“सिस्टर ते दिलं मावशीकडे पाठवून केव्हाच”
तेवढ्यात मावशीच ब्लड ग्रुपचा रिपोर्ट घेऊन आल्या. मी ब्लड बँकेतून ब्लड मिळण्यासाठीचा फॉर्म भरला आणि पुन्हा बेड नंबर १६ म्हणत आवाज दिला. आलो आलो म्हणत तिचा नवरा आला पण त्याची चाल काही ठीक दिसत नव्हती, जवळ आल्यावर तोंडाच्या भपक्यावरून त्याच्या त्या चालीचं रहस्य कळाल!
“नमस्ते डॉक्टर. काय काम हे??” असं त्यानं विचरलं.
अंदाजे त्याचे वय ३५/४० वाटत होतं, आत गेलेले डोळे, मध्येच पडलेलं टक्कल, मळलेल शर्ट आणि तोंडाचा वास एकंदर काय तर महाशय पिऊन कुठतरी पडले असणार अन् उठून डायरेक्ट इकडेच आलेले दिसत होते. तर त्या भपक्यापासून वाचण्यासाठी मी माझा मास्क नाकावर ओढला आणि त्यांना सांगितलं की, “काका हा फॉर्म रक्तपेढीत देऊन या. पेशंटला रक्त लावावं लागेल बाहेरून”
तेवढयात वार्डच्या गेटमधुन शेखर आणि अभिनव आतमध्ये येतांना दिसले. मी त्या माणसाच्या हातात फॉर्म देऊन सगळं समजवून त्यांना पाठवलं. शेखर त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत पाहत मला बोलला “सोपन्या हा इकडं कसा काय रे?”
मी म्हटलं तू कसा ओळखतो याला. तो सांगू लागला अरे मागच्या महिन्यात काही दिवस ART सेंटरला (HIV ची औषधी जिथे मिळते ते डिपार्टमेंट) होतो तेव्हा तिथे यायचा हा माणूस.
मी म्हटलं “का रे”
तर त्यानं सांगितलं की HIV पॉझीटिव आहे तो… औषधं घ्यायला यायचा म्हणून माहिती आहे बाकी काही नाही.
मी म्हटलं “बरं” आणि सांगितलं की काही नाही त्याची बायको ऍडमिट आहे इकडे म्हणून आला होता वार्डला.

अभिनव, शेखर आणि मी थोडावेळ बसलो आणि ते दोघेही आपापल्या डिपार्टमेंटला निघून गेले. मी ही माझी काम करू लागलो. दोन पेशंटला फॉलिस कॅथेटर टाकायचे होते ते केलं व तोपर्यंत 8 वाजले होते. माझी ड्युटी संपली मला रिलिव्ह करायला इंटर्न डॉ. प्रियंका केसकर येणार होती. ती आली आणि मग मी निघालो. पण आज गादीवर जातांनाही माझ्या डोळ्यासमोर सारखा तो लहान पोरगा आणि त्याचाच चेहरा दिसत होता. माय बाप असे काही दिवसांचे सोबती त्यात कायम आजार मागे कसं होईल बिचाऱ्याचं. त्याच धुंदीधुंदीत निगडीला एकदा आणि चिंचवडला एकदा असं दोनदा गाडीला गाडी ठोकता ठोकता राहिलो.
रूमवर पोहचलो व जेवण करुन झोपी गेलो. सकाळीच आठ वाजता ड्युटी असल्यामुळे लवकर झोपलो. खरं तर लायब्ररीमधून वाचण्यासाठी आणलेलं प्रा. शिवाजीराव भोसलेंचं ‘प्रेरणा’ नावाचं पुस्तक आज संपवायचं होतं. पण मनच लागत नव्हतं काय करणार म्हणून झोपी गेलो.

सकाळी लवकर उठून तयार होऊन हॉस्पिटलला पोहचलो. तो कालचा माणूस वार्डच्या दारातच मोबाईल वर बोलतांना दिसला व मी दिसताच माझ्या जवळ आला. सकाळ सकाळी आठ वाजताही भाऊ फुल्ल भपका मारत होता. चहा ऐवजी दारू पिऊन आलेला दिसत होता. “कसाय पेशंट घरी केव्हा सोडणार” म्हणून विचारू लागला. मी थोड्या वेळानी सर राऊंडला येतील तेव्हा त्यांना विचारा म्हणून माझ्या जागेवर आलो आणि नेहमीची काम करू लागलो.
“२३ नंबर बेडवरची आजी रात्री गेली बरं का स्वप्नील”, सिस्टर सांगत होत्या.
कालच आजीची “काय आजी मग घरी जायचय ना?” म्हणत हसत हसत आजीची चौकशी केली होती मी. आजी पण हसून हो म्हटली होती पण रात्रीतून आजीची तब्येत जास्त बिघडली आणि औषधांना ती रिस्पॉन्सचं देत नव्हती म्हणून गेली. त्या आजीबद्दल ऐकून वाईट वाटलं. आठ दिवसांपासून आजीची शुगर चेक करायला जायचो तेव्हा आजी रोज म्हणायची “डॉक्टर घ्या बिस्कीट खा!” पण मी थांब हं, आलो” म्हणत पुढच्या पेशंटकडे जायचो पण आजी न विसरता रोज मला बिस्कीट घे म्हणायची. काल तर बळजबरीन तिच्या सुनेला अख्खा बिस्कीट पूडा मला द्यायला लावला. मी घेत नाही म्हटल्यावर माझ्या ऍप्रोन च्या खिशात टाकायला लावला होता. मीही तिच्या पायाला हात लावून काल तिच्या पाया पडलो होतो. उचलला जात नसला तरी तिने आशीर्वाद द्यायला हाताची हालचाल केली. मी राहू दे म्हणून तिचा हात पकडला आन म्हटलं “आज्जे झोप निवांत. मी खातो नक्की बिस्कीटं.” अशी आजीशी ओळखी होती म्हणून तिच्या जाण्याची बातमी ऐकून डोळ्यात टचकन पाणी आलं, वाईट वाटतं होतं. मी त्या रिकाम्या बेडकडे एकदा क्षणभर पाहिलं आणि पुढच्या कामाला लागलो. संध्याकाळी ८ वाजता ड्युटी संपवून जायला लागलो तेव्हा हेच महाशय पुन्हा खाली भेटले व म्हटले,
“डॉक्टर, आहो कधी सोडता पेशंटला?”
सुदैवानं आज भपका येत नव्हता म्हणजे महाशय शुद्धीत होते.
मी म्हटलं “का घाई करताय? दुसराच दिवस आहे. पूर्ण बरं झाल्यावर घेऊन जा!”
तर तो म्हटला, “आवो वैतागलो बघा मी, तुम्ही लवकर सोडा म्हणजे देतो तिला घरी पाठवून. नको टेन्शन मला जास्त”
मी म्हटलं “का राव असं करता बायको हाये की तुमची. बरी तर होऊद्या आधी आणि पोराला लांब ठेवा म्हटल थोडं त्याला नको हो लागण व्हायला.”
तर तो म्हटला,
“हो तो तिच्यासोबत नसतो माझ्याजवळच असतोय. तिच्याजवळ नाहीच जाऊ देत मी त्याला,” सांगताना त्याची छाती २ बोट फुगलेली दिसतं होती.
“नको तो आजार लावून घेतलाय” म्हणे तिने मागं.
मी म्हटलं
“आवो तुम्हाला पण हायेच की तो आजार”
तो जरा चापपलाच.
म्हटला “हे काय काही बोलताय”
मग मी त्याला ART सेंटरमध्ये आपण भेटलोय असं खोटंच सांगितलं. मग लाईनवर आला आणि म्हटला, “हा हाये HIV पण मी नाही पडत आजारी बिजारी.”
मी त्याला म्हटलं,
“भाऊ HIV म्हणजे काय कुणी अलग नाही पण काळजी घेतली पाहिजे.”
त्याला वाटलं मी त्याच्या चारित्र्यावरच संशय घेतो की काय? अन् तेवढ्यात त्यानं एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. म्हटला, “डॉक्टर नशीबच फुटक होतं. एसटीच्या अक्सिडेंटमध्ये सापडलो एकदा,” असं म्हणत त्यांना पॅन्ट वर करून पायावरचे टाक्यांच्या खुणा दाखवल्या आणि म्हटला “या ऍक्सीडेंटमधी कुणाचं रक्त घुसल काय माहिती जखमेत. सगळी एसटी मधले जखमी दवाखाण्यात भरती केले आणि नंतर वर्ष दोन वर्षांनी ह्या आजाराच कळलं.” मी तर हे ऐकून आवाकच झालो. असं काहीतरी पहिल्यांदाच ऐकत होतो. अक्सिडेंट मुळे कुणाचं जीवन असं HIV ने ग्रस्त झालेली केस आधी मी काही ऐकलेली नव्हती. त्याचं हे ऐकून तर भावुक झालोच तर तो म्हटला, “डॉक्टर अशी गोष्ट हाये बघा त्यात मही काय चुकी हाये का? आणि ह्याच टेन्शन मध्ये डॉक्टर प्यायची सवय लागली.”

मी त्याचा निरोप घेतला अन् रूमवर येऊन याच विचारात झोपी गेलो की, काही चुकी नसतांना काय म्हटलं एखाद्याचा आयुष्य बरबाद होतं राव. त्यात त्याची काय चुकी होती. शेखरला पण ती स्टोरी सांगितली, त्यालाही वाईट वाटलं. सकाळी पुन्हा उठून लवकर तयार झालो आणि हॉस्पिटलला गेलो. आज माझा MSW करणारा मित्र राकेश मला भेटायला येणार होता. त्याची कुणालाही मदत करायची आवड होती. स्वतःच्या समाजसेवी संस्थेमार्फत तो अनेकांना मदतही करत असे हॉस्पिटलमध्येही आल्यावर तो माझ्याशी कमी आणि पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांशीच जास्त बोलायचा. कुणाला हवी ती मदत करायचा, घरची परिस्थिती बेताची असली तरी आर्थिक मदत करायलाही तो मागेपुढे बघत नसे. तो आला तसा आम्ही चहा प्यायला गेलो आणि त्याला मी ती कालची गोष्ट सांगितली, म्हटलं, “बघ राव राक्या एका अक्सिडेंट मुळे अख्खं कुटुंबच उद्धवस्त झालं यार, १६ नंबर बेडवर पेशंट आहे आमच्या वार्डात.” त्यालाही वाईट वाटलं. चहा पिऊन आम्ही वर वार्डात आलो व मी माझ्या कामात लागून गेलो. हा मास्क घालून सगळ्या बेडजवळ जाऊन पेशंटसोबत त्यांच्या नातेवाईकांसोबत बोलत होता, त्याच्या अभ्यासक्रमाचा आणि स्वभाव-वृत्तीचाही तो एक अविभाज्य भाग होता. मी माझं काम करत होतो तर ह्या महशयांचं वार्डभर दुःख हलकं करणं नातेवाईकांना प्रेमानं बोलणं चालू होतं. नवीन पेशंट येणं, काहींना डिस्चार्ज मिळणं चालू होतं. संध्याकाळचे ५ वाजले व आज मला लवकर निघायचं होतं म्हणून मी राकेशला आवाज दिला, तर हे महाशय त्या १६ नंबर पेशंटसोबत मास्क घालुन गप्पा करत होते. त्याच काहीतरी सिरियस बोलणं चालू होतं. त्यांना दुपारीच डिस्चार्ज मिळणार होता पण त्या बाईचा नवरा अजूनही पैसे भरून आला नव्हता म्हणून सिस्टर त्या बाईला दुपारी दोनदा ओरडल्या पण होत्या की कधी येतोय नवरा पैसे भरून. सकाळचा बिल घेऊन गेलाय. सिस्टर ओरडून गेल्यावर काही वेळानं मी राकेशला आवाज दिला तर हा अजून तिथंच बोलत बसला होता, खूप दिवसांची ओळख असल्यासारखं त्याचं बोलणं वाटत होतं. मी पुन्हा आवाज दिला तेव्हा घाईघाईत त्यानं बोलणं संपवलं आणि खिशातून पैसे काढुन त्या बाईच्या हातात दिले. ती नाही नाही म्हणत होती. तिच्या डोळ्यात पाणी दिसत होतं. बहिणीला भेट समज भावाकडून असं म्हणून त्याने ते तिच्या हातात पैसे ठेवले आणि येतो ताई म्हणून निघाला. निघताना त्याच्या डोळयातलं पाणी माझ्यापासून तो लपवू शकला नाही. मला त्याच्या मदतीचे आश्चर्य  नाही वाटलं पण राकेशच्या डोळ्यात सहसा अश्रू येत नव्हते, तो खूप कणखर होता. मीही काही जास्त बोललो नाही व त्याला घेऊन बाहेर चहा प्यायला गेलो. तो आता नॉर्मल झाला होता. आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालूच होत्या व मध्येच पुन्हा आमचा तो टॉपिक निघाला की त्या माणसाचं कुटुंब राव एका अक्सिडेंट मुळे कसं उध्वस्त झालं आणि तो माणूस व्यसनी झाला, सगळ्यांना आजार लागला. त्यानं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनतर त्याने जे सांगितलं ते ऐकून मी थक्कच झालो

रेखाचित्र - समृद्धी कडोलकर

तो म्हटला,
“सोपन्या ते तस काही नाहीये.”
म्हटलं, “मग कसाय?”
तर म्हटला ऐक अन् त्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली.
तो सांगू लागला की;
“स्वप्नील तू तुझं काम करत होतास तेव्हा मी वार्डमध्ये मास्क लावून  फिरू लागलो तेंव्हा अचानक मला एक चेहरा ओळखीचा वाटला मी त्या बेडजवळ गेलो तर लक्षात आलं की ही तर आमच्या बेर्डे सरांची मुलगी वैशाली ताई आहे. बीडला असतांना त्यांच्याकडे आम्ही ट्युशनला जायचो. ६/७ वर्षांपूर्वीच घरातून पळून जाऊन लग्न केलं आणि त्यांनतर आजच दिसली.”
मी मास्क खाली केल्यावर तिनेही मला ओळखलं,
“कसा आलास??”
मी म्हटलं, “शेजारी मित्र आजारी होता म्हणून भेटायला आलोय, तू कशीये?”
आणि माझ्या लक्षात आलं की तू मला १६ नंबर बेड विषयी खाली बोलताना याच HIV च्या पेंशंट विषयी सांगत होतास.
मी विचारलं की,
“ताई कसं काय झाला होता अक्सिडेंट?”
“कोणता अक्सिडेंट?”
ती चक्रावल्यासारखी विचारू लागली. मी तिला तिच्या नवऱ्याची गोष्ट सांगितली तशी ती संतापली.
म्हटली, “कश्याचं काय अन फाटक्यात पाय. पिलं की काही सांगत बसतोय ह्याचा बाप कोणालापण. कशाचा अक्सिडेंट न कश्याच काय!” अन् अचानक ती रडायला लागली आणि तिचं हे ऐकून मीही आवकच झालो. ती सांगू लागली,
“मी बीडला बारावीला असतांना हा याचा बाप पुण्याला कंपनीत कामाला होता. सुटीत गावाकडे यायचा. ओळख व्हती मैत्री झालती, गिफ्ट द्यायचा, आम्हाला प्रेम झालं होतं, पळून जायच्या गोष्टी करायचा, कंपनीमध्ये पर्मनंट जॉब आहे, स्वतःचं घर हाये सांगायचा, लै पैसे असायचे तेव्हा त्याच्याकडं, मीही त्याला भुलली आणि पळून जाऊन याच्यासंग लग्न केलं. इकडं आली पुण्याला तर पिंपरीला भाड्याच २ खोलीचं घर घेतलं. मी विचारलं नवीन कुटय तर म्हणे बांधकाम चालूये. मला खरं वाटलं, सकाळी कंपनीत कामाला जायचं तर रात्री 8 9 लाच घरी जेवायला यायचा, कधी कधी यायचा पण नाही, रोज खिश्यात पैसे राहायचे, कधी पिऊन यायचा, ऑफीसची पार्टी व्हती म्हणून सांगायचा. ६/७ महिने झाले सगळं असं रोजच्यासारखं चालू व्हतं. घर बांधून आज व्हईल उद्या व्हईल या अशेवर मी व्हते. रोज त्याला ईचारायची की काय काम करता तुम्ही तर सांगायचं तुला नाही कळणार. दिवसभर घरी एकटीच राहायची, त्यातच मी पोटुशी झाली, त्याला सांगितलं तर त्याला त्याच काहीच वाटलं नाही. त्याच रोज सकाळ सकाळी जाणं रात्री उशिरा पिऊन घरी येणं चालूच व्हतं. कधी पैसे राहायचे तर कधी किराणा पण भरत नव्हता. एक दिवस घरी दुपारी मी बसली व्हती अन् एक माणूस फटफटीवर आला, येच्या बापासोबत घरी कधी कधी तो जेवायला यायचा. मी त्याला वळखलं. तो म्हटला बाई चला पोलीस स्टेशनला. मी घाबरली म्हटलं काय झालं, तर म्हणे सुनीलला पोलिसांनी उचललाय त्याला जामीन द्यायला चला. मी लै घाबरले म्हटलं काय झालं, हे पोरगं तव्हा पोटात 4 महिन्याच व्हतं, तशीच पोलीस स्टेशनात गेली, तर याला पोलिसांनी चांगलाच सुजवलेला व्हता, मी गेली तसं पोलीस म्हटला बाई काय करायचं याचं? घरी न्यायचं का नवऱ्याला? मी म्हटलं, ‘काय केलंय त्यांनी कशापायी एवढं मारलं?’ पोलिसांनी जे सांगितलं ते ऐकून मी यडी व्हयचीच बाकी व्हती, पोलिसांन सांगितलं बाई दलाल हाय तुझा नवरा. वेश्या पुरवतो लोकांना. मी हे ऐकून मया कानात काहीतरी गरम वतल्यासारखं झालं मला. काल कमी वयाच्या पोरी सप्लाय करतांना सापडला पाचव्यांदा, चौथ्या टाईम सोडला व्हता म्हणे आम्ही त्याला. आता जामीनाशिवाय सोडणार नाही. मी म्हटलं नाही हो असं काही करत नाही कंपनीत कामाला हाये नवरा माझा. तस पोलीस बोलला हा बुधवार पेठेत हाये येची कंपनी..! तिथं दलालाचा जॉब करतो हा..! ऐकून मी एडीच व्हयाची बाकी व्हती. मह्याकडे पैसे नव्हते जामिनासाठी. बाहिर जाऊन कानातले आन साखळ्या मोडून याची जमानात केली. घरी आणलं काहीच सुधरत नव्हतं मह्यायाकडून उरेल पैसे घीऊन हा परत पिऊन आला. मी बोल्ली तर मला मार मार मारलं. पोटूशी व्हते तर पोटात दुखाया लागलं म्हणून ह्याच सरकारी दवाखान्यात आलते तव्हा रक्त तपासल आन कळालं मला एड्स झालंय हैच्या बापाकडून. मला आणि पोराला बी लागण झालीये. आता गर्भ पाडता बी येणार नाही. तव्हापासून ह्यो आजार जडला तरी कंपनीत कामाला जाते ह्या दोघांचं पोट भरते, वर ह्येला प्यायला पैसे लागत नाहीतर मारहाण करतो. पोराकड पाहून जगते. मी आजारी पडले तर त्येला प्यायला कोण पैसे दयीन म्हणून दवाखाण्यात बी जास्त दिवस ठेवत नाही. इथून बी कालचा मागे लागलंय घरी चल अन् जाय कामाला म्हणून. माहेरचं माहेर तुटलं. पोराला जन्मभराचा असा अवघड आजार लागला अन् अशा रोगासोबत हे जीवन नशिबी आलंय”,  म्हणत ती रडू लागली. राकेश सगळं सांगतानाही भावूक झाला होता आणि मी मात्र विचारात गुंग झालो. काही म्हणजे काहीच सुचत नव्हते.
चुक कुणाची होती यात? पूर्ण माहिती न घेता आंधळेपणाने केलेल्या प्रेमाची? की वयात आलेल्या पोरीमध्ये काही बदल जाणवतोय, तिचं वागणं बदलयं, तिच्याकडे आपण पैसे दिलेले नसतांना वस्तू येताय, ह्या सर्व गोष्टींकडे शिक्षक असतांनाही दुर्लक्ष झालेल्या बेर्डे सर व त्यांच्या पत्नीची? की आपण आपण एका मुलीला फसवत असतांना, एका असाध्य रोगाशी तिच नातं जोडून तिचं आयुष्य बरबाद करणाऱ्या पाषाण ह्रदयी तिच्या नवऱ्याची? की अशा बापाच्या पोटी जन्माला येणाऱ्या त्या मुलाची? यात नियतीच्या नियमानं जन्माला आलेल्या त्या लेकराची सोडली तर चूकी प्रत्येकाची होती; पालकांनी वेळेवर पाल्यामध्ये बदल दिसताच सावध होऊन सामंजस्याने प्रकरण हाताळायला हवीत, त्यांच्याशी संवाद साधायला हवा, मुलींनी पूर्ण शहानिशा न करता असे आयुष्याचे निर्णय परस्पर घेता कामा नये. आपल्या साथीदाराला अशा असाध्य आजारात कुण्या सैतानांही ढकलू नये. हे सारं सुधारावं, यातून जागृती व्हावी यासाठी हा लेखनप्रपंच.

लेखक - डॉ. स्वप्निल छायाविलास चौधरी

लेखक हे आयुर्वेदाचार्य डॉक्टर असून त्यांच्या लेखणीतून कविता आणि लेखांमार्फत, तसेच महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या व कवी संमेलनाच्या माध्यमातून सामजिक प्रबोधनाच कार्य करत आहेत.

रेखाचित्र - समृद्धी कडोलकर