By
8th April 2020 | 4min Readपुण्यात आल्यापासून भाषणाचा व कवितांचा छंद लागला. नवनविन विचारप्रवाहातील लोकांची ओळख झाली अन् आयुष्य अधिकाअधिक interesting होऊ लागलं. लिखाण, वाचन, वकृत्व, कविता इत्यादी गोष्टीमध्ये सुधारणा होऊ लागली.
तशी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची ओळख लहानपणीच झाली होती. पण काही दिवसांपूर्वी नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त व्याख्यान द्यायचे होते. तेंव्हा विचारांत अजून भर पडावी म्हणून काही पुस्तकं खरेदी केली व वाचली. महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावरील मला आवडलेले पुस्तक म्हणजे ‘महात्मा बसवेश्वर व कार्ल मार्क्स’. महात्मा बसवेश्वर हे परिवर्तनवादी, भगवान बुद्धांची दयाळू वृत्ती, महाविरांची साधी रहाणी, यशू ख्रिस्त यांसारखे सज्जन व अधुनिक विचारवंत होते. कार्ल मार्क्स व महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांत बऱ्यापैकी साम्य आढळते.
कार्ल मार्क्सने नविन समाजरचनेचा पुरस्कार केला व एका नविन आर्थिक सिद्धांताची स्थापना केली. तद्वतच महात्मा बसवेश्वरांनी ‘कायकवे कैलास’ काम म्हणजेच परमेश्वर अशी कल्पना मांडली व आपल्या समाजातील उच्च – निचतेचा विचार संपवण्यासाठी ज्याप्रमाणे संत कबीरांनी ‘दोहे’ रचले त्याचप्रमाणे महात्मा बसवेश्वरांनी कन्नडमध्ये ‘वचने’ रचले. जसे की;
कासि कंबारनादा
– ज्यांचा संबंध लोखंडी कमाशी आला तो लोहार झाला.
बिसी मडीवाळनादा
– अर्थात ज्याचा संबंध कपडे धुण्याशी आला तो परीट झाला.


महात्मा बसवेश्वरांनी काम म्हणजे कैलास सांगीतले आहे. कार्ल मार्क्सने मुल्यांचा श्रमसिध्दांत मांडून श्रमशक्तीला महत्वाचे स्थान दिले आहे. उत्पादन साधनावर समाजाची सत्ता प्रस्थापित झाल्याशिवाय वर्गरहीत समाज अस्तित्वात येणार नाही. ही साधने जर समाजाच्या हाती असल्यास राजसत्ता देखील समाजाच्या हाती असली पाहीजे व ती येईल. यावर व्याख्यानापेक्षा खासगी चर्चा परिणामकारक ठरेल. भारताच्या इतिहासातील १२ वे शतक हे परिवर्तनवादी शतक होते. कारण याच काळात कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात क्रांतीकारी संत समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला.
महात्मा बसवेश्वरांनी पहिली संसद म्हणजे अनुभव मंडप स्थापन केले आणि विशेष म्हणजे त्यात स्त्रीयांनाही बरोबरीचे स्थान दिले. यातून त्यांनी दिलेल्या समानतेच्या तत्त्वाचा बोध होतो. शिवचरण साहित्य वचनांद्वारे समाजाला मार्गदर्शन मिळाले. अनुभव मंडपाभोवती धर्मप्रसारकांचे एक मोठे जाळे निर्माण केले. एवढंच नाही तर १२ व्या शतकात बसवेश्वरांनी सनातनी, कर्मठवाद्यांच्या विरोधात जाऊन आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. यातून त्यांचे पुरोगामित्व लक्षात येते. त्यासाठी त्यांनी आपल्या प्रधान मंत्रीपदाचा त्यागही केला. समाजपरिवर्तनाच्या विचारांना आणि प्रयत्नांना प्रतिगामी प्रस्थापितांनी सातत्याने केवळ विचारांनी नाही तर शस्त्रांनी प्रतिकार केला आहे. तशा हल्ल्यांना महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या अनुयायांना तोंड द्यावे लागले. त्यांनी ते अतिशय जिद्दीने आपल्या शरणांचे व शरण साहित्याचे रक्षण केले. अनेकांनी बलिदान दिले. महात्मा बसवेश्वरांचे कार्य समाज प्रबोधनाचे आणि गौतम बुद्धांच्या प्रागतिक विचारांना पुढे नेणारेच ठरते.
महात्मा बसवेश्वरांच्या या विचारांचे कार्ल मार्क्स यांच्या विचारांशी असलेल साधर्म्य मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. अर्थात महात्मा बसवेश्वर आणि कार्ल मार्क्स यांच्या कार्यकाळात सुमारे सातशे वर्षांचे अंतर आहे. महात्मा बसवेश्वरांनी धर्मशुध्दीचे तर मार्क्सने धर्मनिर्मुलनाचे तत्त्वज्ञान मांडले. महात्मा बसवेश्वर व कार्ल मार्क्स यांच्या समतेच्या व स्त्रीयांना समान वागणूक देण्याच्या विचारात बरेच साम्य दिसून येते. महात्मा बसवेश्वरांनी व कार्ल मार्क्सने जन्मानुसार नाही तर कष्टानुसार समाजाची विभागणी केली. थोडक्यात श्रम म्हणजेच ईश्वर या संकल्पनेनुसार आपल्या कुष्टातूनच समाजात आपली जागा निश्चित होते असते असे या पुस्तकातून स्पष्ट होते. या दोघांच्या विचारांचे आचारण केले पाहिजे. त्यांना मानाचा सलाम!
पुस्तक: महात्मा बसवेश्वर आणि कार्ल मार्क्स
लेखक: ॲड. एस. एम पाटील
प्रकाशन: सन्मित्र प्रकाशन

