कलेने दिली आयुष्याला दिशा

By Dr. Swapnil Chaudhari 28th March 2020 | 6min Read

औरंगाबाद येथे काही दिवसांपूर्वी दिनांक १४ व १५ मार्च २०२० रोजी एक चित्र प्रदर्शन भरलेलं होतं. दर्दी रसिक, शहराबाहेरील कलाप्रेमी आवर्जून या ठिकाणी भेटी देत होते. २ दिवस असंख्य लोकं या ठिकाणी भेट देऊन गेले आणि याला कारण होतं ते म्हणजे व्याख्यान, शिक्षकी पेशा व कला यांच्या जोरावर विजय गवळी यांनी प्रेमाने जोडलेली माणसं.

“निश्चयाचे बळ | तुका म्हणे हेचि फळ |” या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातील शब्दनशब्द जगून गवळी सरांनी व्यक्ती चित्रांची कला ही आत्मसात केली. याची सुरवात कुठुन झाली असं त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली ती अशी; “२०१८ च्या सुरुवातीला म्हणजे जवळपास दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभांगावरील चिंतनाच्या मी लिहिलेल्या पोस्ट पोलीस इन्स्पेक्टर चांद्रमोरे साहेबांना कोणत्यातरी व्हॉटसप्पच्या ग्रुपवरुन जायच्या. त्या आवडल्यामुळे त्यांनी मला औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलीस स्टेशन मध्ये भेटायला बोलावलं.”

त्या भेटीत चांद्रमोरे साहेबांना चर्चेदरम्यान विजय गवळी हे कला शिक्षक‘ असल्याचं समजले. तसे समजताच त्यांच्यातीलही कला रसिक जागा झाला आणि चांद्रमोरे साहेबांनी त्यांनी त्यांच्या पत्नीचे पेंटिंग पोर्ट्रेट बनवून द्या अशी विनंती केली. १९९० ला जेव्हा चांद्रमोरे यांचे लग्न झाले त्यावेळचा त्यांच्या पत्नीचा फोटो त्यांनी गवळींना दिला. म्हणजे साधारण ३० वर्षांपूर्वी काढलेला तो फोटो होता. तो त्यांना ‘व्यक्तीचित्र’ स्वरुपात बनवून हवा होता. विजय गवळी हे जरी अनेक वर्षांपासून कला शिक्षक म्हणून काम करीत असले तरी व्यक्तीचित्रे काढण्याबाबतचे औपचारिक शिक्षण घेतले नसल्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे नकार दिला. एखादा चांगला कलाकार शोधून त्याकडून चांद्रमोरे यांचे काम पूर्ण करायच्या हेतूने गवळींनी अनेक लोकांचा शोध घेतला. परंतु बरेच कलाकार त्याचे खूप पैसे सांगत होते आणि त्यातच बरेच दिवस गेले. शेवटी एका सन्माननीय चित्रकारांनी गवळी यांच्या मैत्रीपूर्ण शब्दाखातर ठराविक किंमतीत ‘पोर्टेट’ बनवून देतो म्हटल्यावर त्यांना काही आगाऊ पैसे देऊन पेंटिंगचे काम त्या चित्रकाराला दिले. गवळी यांचा प्रामाणिक स्वभाव व साधेपणा यातून स्पष्ट होते. पुढे काही दिवस वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.

४ ते ६ महिन्यांनी चित्र पूर्ण झाल्यावर चांद्रमोरे साहेब आणि विजय गवळी हे चित्रकाराकडे बघायला गेले. परंतु ते दोघांनाही पसंत पडले नाही. चांद्रमोरे साहेबांनी आवडलं नसल्याचा निरोप विजयजी गवळींकडून त्या चित्रकाराला द्यायला सांगितला. पेंटिंग मध्ये मास्टर असणाऱ्या त्या चित्रकाराला हा निरोप देणं गवळी यांना कठीण होतं पण पर्याय ही नव्हता. चित्रकाराला निरोप दिला. काही दिवसांनी चांद्रमोरे साहेबांचा फोन आला, “गवळी सरपैसेही गेले आणि पेंटिंगही नाही नीट बनलं” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आधीच मनाला हुरहूर वाटत असताना चांद्रमोरे यांच्या शब्दांनी गवळींना व्यथित केले.

शेवटी विजय गवळी यांनी मनात ठरवलं आणि स्वतःला सांगितल की, हे पेंटिंग आता एक पैसाही न घेता स्वखर्चातून स्वत: बनवायचं आणि तब्बल दीड वर्ष त्यांनी ‘व्यक्तिचित्र’ काढण्याची प्रॅक्टिस सातत्याने केली. रोज पहाटे ५ ला उठून रोज किमान तीन तास सत्याताने पेटिंगवर काम करायचे करायचे. ‘व्यक्तिचित्र’ रेखाटणे हा कलाप्रकार दिसतो तितका सोपा नाही पण  असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे” हा तुकोबांचा अभंग सोबतीला होताच. मग सलग अठरा महिने रोज सकाळी पाच ते आठ असा हा अथक प्रयत्नांच्या प्रवास चालूच राहिला. चांद्रमोरे साहेबांच्या पत्नीचेही उत्कृष्च पोर्टेट त्यांनी बनवून तर दिलेच आणि पुढे न थांबता अशी अनेक व्यक्तीचित्रे विजय गवळी यांच्या हातातून आकार घेऊ लागली. एकापेक्षा एक सुंदर व्यक्तिचित्रे आणि त्यातूनच मग काही महिन्यांनी साठहून व्यक्तिचित्रे तयार झाली. त्याचेच भव्य चित्रप्रदर्शन नुकतेच मार्च २०२० मध्ये औरंगाबाद येथे पार पडलं. आयुष्यातील एखादा प्रसंग कलाटणी देणारा ठरतो, तसाच हा २०१८ मधील क्षण, Hidden Talent सापडणे आणि नव निर्मितीला वाव असंच म्हणावे लागेल.

विजय गवळींबद्दल थोडे अजून सांगावेसे वाटते. तसं तर त्यांची कलेप्रती असलेली निष्ठा, त्याबद्दलची आवड तशी शालेय वयापासूनच पण घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे दहावीनंतरच्या शिक्षणाचा प्रश्न समोर उभा होता. त्यामुळे काही तरी रोख कमाई केली पाहिजे याची जाणीव त्यांना झाली म्हणून त्यांनी १९९६ साली Art Teacher Diploma (ATD) च्या कोर्सला प्रवेश घेतला आणि एका पेंटर कडे काम करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे काम नसलं तर ते भिंती रंगवायला जायचे पण रंगाची सोबत मात्र त्यांनी कधीच सोडली नाही.

पुढे त्यांच्या मामांच्या मदतीने व स्वतः मिळवलेल्या काही पैशांतून त्यांच ATD चे शिक्षण पूर्ण झालं. पण तरी या क्षेत्रातलं पुढचं शिक्षण घ्यावे अशी इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती. समोर उपायही दिसत नव्हता. शेवटी म्हणतात ना “इच्छा तेथे मार्ग”, तसेच वडिलांच्या वारकरी संप्रदायातील एका ओळखीने एका ठिकाणी त्यांना नोकरी मिळाली आणि पैशांचा प्रश्न सुटला. त्यांनी  त्यासोबत मग लगेच २००६ ला Art Master (AM) ला बाहेरुन प्रवेश घेतला व त्यामुळे त्यांच्या पगारात वाढ झाली. सगळं सुरळीत चाललाय असं वाटतच गवळी नापास झाले पण पत्नीच्या पाठिंब्याने नोकरी करता करता शेवटी Art Master जिद्दीने पूर्ण केलंच आणि मग पूर्णवेळ कला शिक्षक म्हणून काम करु लागले व आता २०१९ मध्ये ‘व्यक्तीचित्रे’ या कला प्रकारात त्यांनी प्राविण्य मिळवले.

पुढे चळवळ व वाचन यातून मग अभंगाची गोडी वाचन, मनन, चिंतन आणि व्याख्याने अशी टप्प्याटप्प्याने आयुष्य समृद्ध होत गेले व प्रवास सुखकर होण्यास सुरुवात झाली. स्टेजवर जायला घाबरणारे विजय गवळी हळूहळू तुकोबारायांच्या अभंगांचे विवेचन शेकडो श्रोत्यांसमोर करु लागले. २०१६ ला तर दुबईला सुप्रसिद्ध वक्ते प्रदीप सोळंके यांच्या समवेत “तुकोबारायांचे स्वराज्यातील योगदान” या विषयावर व्यक्त होण्याची त्यांना संधी विजय गवळींना मिळाली. शेकडो व्याख्याने महाराष्ट्रभर झाली. तुकोबारायांच्या वैज्ञानिक अभंगावर सोशल मीडियाच्या माध्यमातून दीडशेच्या वर व्हिडिओ त्यांनी सातत्याने प्रसारीत केलेत. या दरम्यान संत तुकोबारायांच्या गाथेचा अभ्यास चालू असताना तुकास्र, असाध्य ते साध्य, भेदाभेद भ्रम अमंगळ, तुकोबाचा विठोबा तुकोबांचे वैकुंठ, तुका म्हणे, उजळावया आलो वाटा आणि डॉ. आ ह सरांची प्रस्तावना असलेलं तुकाराम गाथेतील १००० सुविचार अशी सात पुस्तक त्यांनी लिहली. या अभ्यासपूर्ण लेखनासाठी भंडारा डोंगर ट्रस्ट, देहू व तुकाराम ज्ञानपीठाच्या वतीने वारकरी भूषण‘ हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला. पुढे भविष्यात तुकोबारायांच्या अभंगाच्या विवेचनाला चित्रांची जोड देऊन गाथेतील विचार घराघरात पोहोचविण्याचा त्यांचा मानस आहे.

आज विजय गवळी हे एक व्याख्याता, शिक्षक, चित्रकार अशा अनेक भूमिकेत लीलया मुक्तसंचार करत असताना दहावीनंतरच्या आयुष्याला कलेने दिलेली दिशा यांस ते परीसस्पर्श मानतात. आयुष्यात जर कदाचित कला आलीच नसती तर हे जीवन इतकं सुंदर होऊ शकलं नसतं असं त्यांचे ठाम मत आहे. सुंदर व्यक्तीचित्रे रेखाटून तसेच त्यांच्या मुखातून तुकोबारायांचा विचार महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या आणि जगाच्या पाठीवर पोहोचावा हीच भावना ते नम्रपणे नेहमी व्यक्त करतात. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विजय गवळी हे पुढेही नक्कीच अधिकाधिक चांगले काम करतील व एक नवी कलाकारी व वैचारिक पिढी घडवण्याचे काम त्यांच्या हातून होईल यात तीळ मात्र शंका नाही. झिवा कडून त्यांना सदिच्छा व सलाम!

लेखक - डॉ. स्वप्निल छायाविलास चौधरी

लेखक हे आयुर्वेदाचार्य डॉक्टर असून त्यांच्या लेखणीतून कविता आणि लेखांमार्फत, तसेच महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या व कवी संमेलनाच्या माध्यमातून सामजिक प्रबोधनाच कार्य करत आहेत.