कला @ लॉकडाऊन

By Meghal Kharat 2nd April 2020 | 6min Read

साधारण २० मार्चपासून मी सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे घरीच आहे. Work From Home (WFH) करतोय, रोज बातम्या पाहून चिंता पण वाटते ह्या संकटाची. पहिले दोन – तीन दिवस मजेत गेले पण नंतर वेळ जात नवता कारण एवढं घरी राहायची सवयच नाही कधी आणि बाहेर पडूही शकत नाही. घरच्यांसोबत गप्पा होतच आहेत, अग्दी जुने सगळे फोटो अल्बम काढून बघून झाले. सगळ्या नातेवाईकांना फोन करून झाले. Amazon, Netflix सुद्धा बघून झालं. पत्ते खेळून झाले, साफसफाई करून झाली, जुने पत्र वाचून झाले. जेवढं काही करता येईल तेवढं करुन झालं

असच आता काय करायचं म्हणून विचार करत असताना हॉलमध्ये भिंतींवर दिमाखात अडकवलेली माझी ‘गिटार’ दिसली आणि मग काहीच नाही तर साफ करुन ठेवतो असं मनात येऊन गेलं. साफ केलीच आहे तर थोडी वाजवून घेऊ. मग ती ट्यून (Tune) केली आणि थोडी वाजवली. हात अजूनही गिटार वर आहे बघून मलाच भारी वाटलं. खरं गिटार पहिल्यांदा घरी आणली तेव्हा खूप खुष होतो मी! २०१० चा तो काळ असेल. क्लास अगोदरच बघून ठेवला होता. मी गिटार घेऊन सायकल वर किंवा सिक्स सीटरने जायचो क्लासला. तिकडे एकदम खतरनाक लक्ष देऊन शिकायचो आणि घरी आल्या आल्या प्रॅक्टिस करायचो हे ठरलेलं असायचं. पहिल्यांदा जेव्हा मी गिटार वर सगळ्यांना हक्काने समोर बसवून ‘Happy Birthday’ वाजवलं तेव्हा त्यांना पण छान वाटलं होतं. मग कोणतंही गाणं वाजवायला शिकलो की घरी येऊन आधी मम्मीला, भावाला व आज्जीला वाजवून दाखवायचो तेव्हा काय आनंद वाटायचा मला…!

खरं सांगायचं झालं तर मी प्रामाणिकपणे २०१० ते २०१२ दरम्यान गिटार वाजवत होतो पण नंतर ‘वेळ नाही’ चा शिकार मी पण झालो आणि सुटली गिटार ती सुटलीच. त्यानंतर बाकी गोष्टींमध्ये एवढा गुंतत गेलो की स्वतःसाठी वेळ उरलाच नव्हता. सगळ्यांना आवर्जून भेटणं होत होतं पण स्वतःला भेटणं जमत नव्हतं. आता लॉकडाऊनमुळे वेळ मिळाल्यावर पुन्हा लक्ष गेलं आणि माझ्यातल्या जुन्या कलाकाराशी मी नव्याने ओळख केली! गेले १० दिवस रोज गिटार वाजवतोय. माझे जुने गिटार नोट्स काढले आहेत शोधून. खरंच खूप मस्त वाटतंय आता! बऱ्याच वर्षांनी नुसती Cellphone अन् Computer वर फिरणारी बोटं आता पुन्हा गिटारच्या strings वर फिरायला लागलीत. वाजवत असताना २ तास कसे निघून जातात हे सुद्धा कळत नाही. त्या दोन तासमध्ये बाकी काहीच आठवत नाही. ईमेल – मोबाईल हे सगळं आहेच पण स्वतःसाठी काढलेला वेळ सगळ्यात भारी वाटतोय!

‘वेळ नसतो’ हे खरं खूप उगाच कारण देणारं मोठा वाक्य झालंय. आजकाल बघायला गेलं तर आपण नक्की वेळ काढू शकतो सगळ्यासाठीच पण प्रॉब्लेम हा झालंय की स्वतःची सोडून जगाची काळजी जास्त असते आपल्याला. दुसरं कुणी आपल्यासाठी वेळ देऊ किंवा न देऊ आपण आपल्यासाठी वेळ दिलाच पहिजे ना? आपण आपल्याशी बोललं पाहिजे ना? स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. स्वतःचं मन पण तर जपलच पाहिजे ना? लॉकडाऊन आहे पण त्याने काहीच खरं थांबला नाहीये ना? मी तर म्हणेन लॉकडाऊनने मला माझ्यातल्या जुन्या कलाकाराला पुन्हा भेटायला भाग पाडलं. माझं गिटार वाजवन बघून नानांनी (वडिलांनी) पण त्यांचं ‘बुलबुल’ काढलं आणि वाजवयला लागले. ते नुकतेच रिटायर झाले आहेत पण त्यांच्यातला तरुणपणा एकदम ठणठणीत आहे. आपण कधी कधी उगाच स्वतःला कारणं देत असतो. ही कारणं देण्यापेक्षा वेळ दिला ना स्वतःला की गोष्टी खरंच खूप सुंदर होतात! कारणं काहीही असूद्यात पण ह्या मिळालेल्या वेळात आपण आपल्यातल्याच कला पुन्हा गोंजरायला सुरू करुच शकतो ना? सध्याच्या Quarantine काळात ‘वेळ मिळत नाही’ हे कारण सुद्धा आता कुणाला पटणार नाही. सध्या आपल्याकडे वेळच वेळ आहे. तो आपल्यातल्या कलाकाराला दिला तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे!

सध्याची परिस्थिती सगळ्यांसाठीच नवीन आहे पण सगळं नीट झाल्यावर लॉकडाऊनने मला आयुष्यात काय दिलं असा प्रश्न पडल्यावर त्याच उत्तर आपल्याकडे आसलं पाहिजे! काही वर्षांनी जेव्हा आपण याच लॉकडाऊनबद्दल बोलत असू तेव्हा लॉकडाऊनने मला हरवलेला कलाकार पुन्हा शोधून दिला एवढं मी नक्कीच सांगेन! तर दोस्तहो, आपल्यातली कला पुन्हा आठवून बघा. हा जो वेळ मिळाला आहे तो सुद्धा कमी वाटायला लागेल. मिळालाच आहे वेळ तर स्वतःसाठी थोडा स्वार्थी होऊन आत दडलेल्या कलाकाराला शोधायलाच हावं! मी माझ्यातला कलाकार तर पुन्हा शोधलाय… तुम्ही शोधताय ना?

लेखक - मेघल सुनिल खरात

लेखक हे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. तसेच लिखाण, कविता अतिषय वेगळ्या प्रकारे करतात. स्वच्छंदी फिरायला त्यांना आवडतं. ललित लेखनाकडे त्यांचा कल आहे.