एक ‘उत्तम’ पुस्तक- भटक्यांचे लग्न

By Ravi Nimbalkar 5th April 2020 | 8min Read

भव्य-दिव्य सेट, विद्युत रोषणाईचा झगमगाट, न मोजता येतील एवढे खाण्याचे पदार्थ, ‘अबबं! हे काय, नवरदेव तर चक्क हत्तीवरून येतोय अन् नवरी राजेशाही थाटात पालखीतून येतेय’. हे वर्णन कुठल्या पिक्चर मधलं नाही, तर हे आहे एका श्रीमंतांच्या मुलाच्या लग्नातील. हौस म्हणून असो किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून असो, आजकाल लाखो करोडो रुपयांचा चुराडा करून भव्यदिव्य लग्न होतात.

परंतु गावाच्या कडेला पाल (तंबू) ठोकून राहणारा, एका गावाहून दुसऱ्या गावाला फिरणारा घिसाडी असेल किंवा पाथरवट असेल. किंवा रस्त्याच्या कडेला ढोल वाजवत उंच दोरीवरून लहान मुलीला चालवणारा डोंबारी असेल. गुबूगुबू वाजवत यंदा पाऊस पडेल का? असं विचारणारा नंदीबैलवाला असेल. या लोकांच्या बाबतीत कधी विचार केलाय का ओ! की ही लोकं कुठं राहत असतील? याचं गाव कोणतं? यांना शेती आहे का? यांची लेकरं शाळेत जातात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं यांची लग्न नेमकी होतात तरी कशी? हां! यांच्या लग्नाला जायचं असेल त्या लग्नातील गंमती जमती, त्यांच्या हळदी, तिथले कार्यक्रम अनुभवायचे असतील तर मग नक्कीच वाचा उत्तम कांबळे ‘लिखित भटक्यांचे’ लग्न हे पुस्तक.

आपल्याकडे विवाह हा एक अतिशय पवित्र असा धर्म संस्कार मानला जातो. मग वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या जाती यांच्या लग्नाच्या पध्दतीही वेगवेगळ्याच. आपल्याला पत्ता सांगण्यासाठी एक विशिष्ट गाव आहे. त्या गावात घर आहे. पोटापाण्यासाठी शेती आहे, व्यवसाय आहे किंवा किमान नोकरी तरी आहे. थोडक्यात काय तर आपलं आयुष्य स्थीर आहे. परंतु या स्थीर असलेल्या आपल्या जगाभोवती एक अस्थीर जग ही भटकत फिरत आहे. कधी या गावाहून त्याला गावाला. सरकारनं त्या भटक्या जगाला एक नाव दिलंय ते म्हणजे ‘भटक्या व विमुक्त जाती.’ या पुस्तकात या भटक्या जाती मध्ये लग्न कसे होतात एवढंच सांगितलं नाही तर भटक्या जाती कोणकोणत्या आहेत? त्यातील पोटजाती कोणत्या? त्यांची आडनांवं कोणती आहेत? हे सगळं अतिशय विस्तृत दिलं आहे.

त्याच बरोबर या जातीचा इतिहास ही थोडक्यात सांगितला आहे. कधी काळी राजेरजवाडे यांच्याशी संबंधित असलेल्या या जातींना आर्यांनी नीच स्थान दिले. तसेच परकीय आक्रमणानंतर उपजीविकेसाठी यांनी जंगलाचा आश्रय घेतला. परंतु पुढे इंग्रजांनी जंगलावरही आक्रमण केली तेव्हा या भटक्यांनी इंग्रजांना तीव्र विरोध केला. या विरोधातूनच उमाजी नाईक सारखा स्वातंत्र योध्दा निर्माण झाला. या होणाऱ्या प्रचंड विरोधामुळे मुळे इंग्रजांनी ‘१८७१ चा गुन्हेगार जमातीचा कायदा’ केला अन् या भटक्यांच्या कपाळावर गुन्हेगार म्हणून कायमचा शिक्का बसला. स्वातंत्र्यानंतर कायद्यात खूप बदल झाले. मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचे अनेक प्रयत्न ही सुरू आहेत. परंतु आजही तथाकथित प्रतिष्ठीत व स्थीर असलेल्या समाजाचा यांच्या विषयीचा दृष्टीकोन म्हणावा तसा बदलला नाही. या पुस्तकात ज्या ज्या जातीतील लग्नाची माहिती दिली आहे त्या जातीचा ओझरता परंतु समजेल असा परिचय ही दिला आहे. त्या जातीचे वास्तव्य कुठं कुठं आहे? त्यांची देवदैवते व देवक कोणतं आहे? त्यांचा नेमका इतिहास काय आहे?

भटक्यांमध्ये जातपंचायत ही सर्वश्रेष्ट आहे. तिचे नियम, कायदे जातीला बंधनकारक आहेत. लग्नकार्यात तर बहुतेक अधिकार पंचांच्याच हातात आहेत. अगदी मुलगी बघायला जाणे, लग्न ठरवताना मध्यस्थी करणं, लग्नाच्या वेळी लक्ष ठेवणं, लग्नानंतर काही अडचणी आल्यातर त्यात ही यांचा हस्तक्षेप असतोच. जातपंचायतचे कायदे लिखित स्वरूपात नसले तरी अतिशय कडक व बंधनकारक असतात. आपापल्या कुलदैवताला साक्षी ठेवून निवाडे दिले जातात. प्रत्येक जात वेगळी तसे त्यांचे कायदे व चालीरीती सुध्दा वेगवेगळ्या आहेत. बहुतांशी ते निसर्गच्या जवळ जाणारे आणि मातृप्रधान आहेत. याचे लग्नसोहळे वेगळे, घटस्फोट पद्धती ही वेगळ्या आहेत. बहुतेक भटक्या जातीत बालविवाह आहेत. हुंडा हा मुलांकडून मुलीला द्यावा लागतो. हुंडा हा अगदी सव्वा रूपया पासून ते चार-पाचशे रूपया पर्यंत जरी असला तरी तेवढे पैसे या लोकांसाठी खूप आहेत. बऱ्याचदा लग्नाचा खर्च सुद्धा मुलाकडील मंडळींना करावा लागतो. तर काही ठिकाणी अर्धा-अर्धा खर्च वाटून घेतला जातो तर कधी खर्चातील दोन भाग मुलांकडे तर एक भाग मुलीकडे असतो. बहुतेक लग्नात मांसाहार, दारू यांचे प्रमाण ही जास्त आहे. घटस्फोटीत किंवा विधवेला सुध्दा पुन्हा लग्न करण्याची मुभा बऱ्याच जातीत आहे. ‘कैकाडी’, ‘कूचकोरवी’, ‘पालमोर’ या जातीत लग्नासाठी मुलगी शोधणे हा प्रकार नाही. कारण, एखाद्या मुलीचे लग्न झाल्यावर तिला पहिल्या ज्या दोन मुली होतात, त्यांच्यावर माहेरच्या माणसांचा जन्मसिद्ध हक्क आहे. जर माहेरच्या माणसाला न विचारता दुसरीकडे कोठे लग्न केले तर दंड केला जातो. ‘घिसाडी’ समाजात आई-वडील ठरवतील त्याच मुलीसोबत लग्न करावं लागतं. यात मुलाची स्वत:ची निवड, पंसती इत्यादी गोष्टींना स्थान नाही.

‘ओढ बेलदार’, ‘रजपूत बेलदार’ या समाजात मुलीला मागणी घालण्याची खूप विचित्र पद्धत आहे. या कार्यक्रमाला ‘सगाई’ असं म्हणतात. यासाठी जातपंचायत भरवली जाते. यासाठी मुलाकडील लोकांनी मुलीकडील मंडळींसाठी एक गुळाची ढेप घेऊन जायची असते. ही ढेप फोडून छोटे छोटे गुळाचे खडे प्रत्येकाच्या हातात दिले जातात. मुलीकडील किंवा मुलाकडील कुटुंबात काही दोष आहे का? मुलाचे किंवा मुलीचे पुर्वी लग्न झाले आहे? समाजाने कुणाला वाळीत टाकले आहे का? आदी प्रश्र्नांची चर्चा सुरू होते. यापैकी कोणत्याही प्रश्न उपस्थित झाला नाही, तर मग सर्वांनी मुठीत धरलेला गुळ सोडायचा असतो. जर एखादा प्रश्न निर्माण झालाच तर त्याचा तोडगा निघेपर्यंत कित्येक तास तसंच गुळाचा खडा मुठीत धरून बसावं लागतं. तर ‘डोंबारी’ समाजात जवळच्याच नव्हे तर दुरच्या  नात्यातील मुलगी करण्यास बंदी आहे. ‘लमाणाच्यात’ मुलगी बघायला पंच (नायक), कारभारी, सरपंच, नवऱ्या मुलाचा बाप व भाऊ जातो. मुलगी पाहण्यासाठी महिला व लग्न ज्याचं आहे अशा मुलाला सुध्दा परवानगी नसते. यांच्या लग्नातील खूप बारीकसारीक गोष्टी या पुस्तकात  दिल्या आहेत. ‘पंचाळ’ जातीत भाचीशी लग्न होऊ शकते परंतु लहान बहिणीची मुलगी मोठ्या भावाला चालत नाही. या भटक्या जातीतील लग्न सोपे, सुटसुटीत आणि स्वस्त आहे. मुलगी पसंत पडली की लगेच साखरपुडा व लग्न होते. या पध्दतीच्या लग्नाला आपल्या लोकांकडून ‘गेटकेन’ हा शब्द वापरला जातो. कडकलक्ष्मी डोक्यावर घेऊन फिरणारा, नावा चालवणारा, चुना भाजण्याचे काम करणारा समाज म्हणजे ‘फिरस्ते कोळी’ यांच्यात सर्रास बालविवाह चालतो. कधी कधी तर मुलगी पाळण्यात असतानाच पाळण्याला बाशिंग बांधल जात.

‘फासे पारधी’ समाजात मुला-मुलींच्या पंसतीचा विचार केला जात नाही. आई-वडील ठरवतील त्यांच्याशीच लग्न करावे लागते. शक्यतो साटे-लोटे पध्दतीने लग्न होतं. हुंडा देणेघेणे प्रथा यांच्यात नाही. ‘गोपाळ’ समाजात कसरतीचे काम करण्यामुलीला जास्त मागणी आहे. तर ‘भामट्यांच्या’ जातीत मुलगा जेवढा जास्त गुन्हेगार तेवढा त्याला मागणी जास्त.
यासाठी लहानपणीच मुलाला खूप मार दिला जातो. डोळ्यात चटणी टाकणे, त्याला जमिनीवर आपटणे इत्यादी सवय लहानपणीच लावली जाते. ‘नंदीवाल्यांच्यात’ मुलगी जन्माला आली की लगेच तिचे लग्न ठरवले जाते. मुलाचे आईवडील त्या मुलीच्या टाळूवर तेल लावून, सून स्वीकारतात. ‘वंजारी’ समाजात लग्न ठरवताना दोन्ही घरचा सात पिढ्यांचा इतिहास काढला जातो.

‘श्रीरामभक्तरू’ या जातीत मुलांचे लग्न जमणे ही खूपच अवघड आहे. कारण कोणताही मुलीचा बाप आपली मुलगी सहजासहजी कुणाला देत नाही. यासाठी मुलांची परिक्षा घेतली जाते. ती परिक्षा काही एक दोन तासांची नसून पुर्ण एकवर्षाची असते. यासाठी मुलाच्या वडिलांना मुलीच्या बापाची वारंवार मनधरणी करावी लागते. ती मनधरणी साधीसुधी नसून प्रत्येक वेळी मुलीच्या वडिलांना दारू द्यावी लागते. मग कुठेतरी तो मुलीचा बाप तयार होतो. पण मुलगी देण्यासाठी नाही तर पोराची परिक्षा घेण्यासाठी. या एका वर्षाच्या परिक्षेत त्या मुलाला आपल्या होणाऱ्या सासू सासऱ्या सोबत भीक मागत फिरावं लागतं. मिळालेल्या उत्पन्नातून अर्धा भाग द्यावा लागतो. या कालावधीत मुलाची मिळकत, स्वभाव, वागण्याची पद्धत बघीतली जाते. यासर्व कसोट्यात पास झाला तरच लग्न जमते. यांच्यात लग्न मात्र बुधवारीच होते.

बऱ्याच भटक्यांमध्ये लग्न झाल्यावर जर नवरा-बायकोचे पटत नसेल तर नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला सोडून देऊ शकते. परंतु यासाठी जातपंचायत बोलवावी लागते, त्यांच्या सहमती शिवाय फारकत होऊ शकत नाही. यासाठी कधी पंचाला पैसे तर कधी दारू द्यावी लागते. काही जातीत घटस्फोट घेताना एक बाभळीची लहान काठी आणून ठेवतात आणि जर घटस्फोट घेणं निश्चित झालं तर कुऱ्हाडीच्या एका घावात दोन तुकडे करतात तर कुठे काडी हाताने मोडून टाकतात. असं केलं की नवरा बायको वेगवेगळे होतात. कदाचित याचमुळे घटस्फोटासाठी मराठी ‘काडीमोड घेणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा. बहुतेक भटक्यांच्या जातीत विधवा बाईला किंवा काडीमोड झालेल्या बाईला दुसरे लग्न करता येते. याला ही जात पंचायतीची मान्यता लागते. या लग्नाला ‘पाट लावणे’, ‘मुहूर्त लावणे’, ‘मथूर लावणे’ किंवा आपल्याकडे ग्रामीण भागात एक शिवी म्हणून वापरात येणारा शब्द ‘मोहतुर लावणे’ असेही म्हणतात. या दुसऱ्या होणाऱ्या लग्नाला सवाष्ण महिलेला जाता येत नाही तर ही लग्न दुर कुठेतरी मंदीरात रात्रीच्या वेळी लावले जातात. भटक्यांच्या लग्नातील लग्न जमवणे, लग्न होणे, लग्नाच्या विधी या सगळ्या गोष्टी अतिशय बारकाईने लेखकाने या पुस्तकात टिपल्या आहेत.

ह्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच भटक्या जाती व त्यांच्या विषयी माहिती दिल्यामुळे पुस्तक वाचायला खूप सोपं जातं. प्रत्येक जातीतील लग्नाचे वर्णन इतक्या सहज, सोप्पं व वास्तववादी केले आहे की, प्रत्येक कार्यक्रमात आपण स्वत: तिथे सहभागी आहोत असं वाटतं व आपणं त्या लग्नाचाच भाग होऊन जातो. अवघं १३२ पानांचं हे पुस्तक एक वेगळ्याच जगात आपल्याला घेऊन जातं. बऱ्याच वेळा वाटायला लागलं ‘अरे यार! हे असं सुध्दा असतयं काय?’ माझं वैयक्तिक मत असं की वाचनाची आवड असणाऱ्यांनी तर हे पुस्तक वाचावंच परंतु आवड नसणाऱ्यांनी सुध्दा जर दर दिवशी एक एक चॅप्टर वाचून एका एका लग्नाला जाऊन यावं.
एक ‘उत्तम’ पुस्तक- भटक्यांचे लग्न.

पुस्तक: भटक्यांचे लग्न
लेखक: उत्तम कांबळे
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन
सुधारीत आवृत्ती: १ ऑक्टोबर २०१० ( पाचवी आवृत्ती)

लेखक - रवी निंबाळकर

लेखक हे शिक्षक असून गेले अनेक वर्षे उस्मानाबाद येथे क्लासेस चालवतात. नव्या पिढीला नवी दिशा देण्याचे काम ते करतात. तसेच पुरोगामी चळवळीत पुढाकार घेऊन अनेक सामाजिक कामात कार्यरत आहेत.