‘अनलाइकली हिरो – ओम पुरी’ एक जबरदस्त फॅनने केलेली पुस्तकाची समिक्षा!

By Ravi Nimbalkar 27th March 2020 | 6min Read

गणेशोत्सवाच्या काळात आमच्या येथे वेगवेगळी गणेश मंडळं रात्री व्हि.सी.आर. आणून पिक्चर दाखवायचे. दुपारी शाळा सुटली की आम्ही सगळे गणेश मंडळासमोर आज कोणता पिक्चर आहे ते बघून यायचो. त्यातील हाणामारीचा जो पिक्चर असायचा तिथं जाऊन बसायचो. यात आमची आवड होती ती म्हणजे सनी देओल, दे मार पिक्चर. यात विशेष आवडायचा तो पिक्चर म्हणजे ‘नरसिंहा’. यात पहिल्यांदा ओळख झाली ती ‘बाप जी’ ची. दमदार आवाजाचा खतरनाक ओम पुरी.

पुढे पुढे अभिनय, संवाद फेक, स्टोरी असल्याकाही गोष्टी माहित व्हायला लागल्यावर या अभिनेतच्या दमदार अभिनयाच्या प्रेमात पडलो. जरा जास्तच वाचायला लागल्यावर इंटरनेट कळायला लागलं, युट्युब माहीत झालं अन् वेड लागल्यागत ओम पुरीची मालिका ‘भारत एक खोज (यात जवळपास १५ भुमिका ओम पुरी ने केल्या आहेत) पुन्हा पुन्हा बघीतली. भिष्म सहानी लिखित ‘तमस’ बघून घेतलं, यात तर ओम पुरी अभिनय अफलातून आहे. काही काही प्रसंगात संवाद नाही परंतु डोळे अन् चेहरा खूप खूप काही सांगून जातो. हलकीफुलकी विनोद ढंगाजी भूमिका असलेली ‘कक्काजी कहीन’ ही मालिका सुध्दा पाहिली. अक्षरशः या माणसाच्या अभिनयाच्या आणि आवाजच्या प्रेमात पडलो. अन् याच प्रेमापोटी ओम पुरीच्या बायकोने लिहलेले ‘अनलाईकली हिरो- ओम पुरी’ हे पुस्तक यावर्षी उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनातून विकत घेतलं. ते आता पुर्ण वाचून काढलं.

या पुस्तकाच्या बाबतीत माझा वैयक्तिक निष्कर्ष काय तर केवळ “भ्रमनिरास”. या पुस्तकातील जमेची बाजू म्हणजे ओम पुरीचा अतिशय जवळचा मित्र अन् तितक्यात ताकदीचा अभिनेता नसिरुद्दीन शाहने लिहिलेलं ‘ओम स्वीट ओम’ हे एक सदर आणि सर्वात शेवटी स्वत: ओम पुरी ने लिहलेले ‘एक दृष्टीक्षेप भारतीय चित्रपटांवर’ आणि ‘कलाकारांना सल्ला’ हे लेख वाचनिय आहेत. ओम पुरीचे बालपण अतिशय दारिद्रयात गेले, चहाच्या टपरी पासून ते हाॅटेलमध्ये भांडी घासण्यापर्यंत काम केले. बालपणात एका पंडिताने केलेला लैंगिक छळ, चोरी केली म्हणून झालेला वडिलांना झालेला तुरुंगावास ह्या गोष्टीचा ओम पुरीच्या बालमनावर झालेला परिणाम. परंतु भाषांतराची गडबड असेल किंवा लिखाणाची पध्दत यामुळे बालपणीचे काही प्रसंग वाचताना वाचकांचा खूप गोंधळ उडतो.

मामाच्या घरी शिक्षणासाठी असताना मामी सोबत गैरकृत्य केल्यामुळे मामाने हाकलून दिले. यानंतर त्यांच्या एका मित्राने शिक्षणासाठी आपल्या घरी ठेवून घेतले. बी. ए. ला असताना नाटकाच्या ओढीने काॅलेजमधील युवा महोत्सवात अनहोनी या पंजाबी नाटकात काम केले. हे काम बघून आधुनिक पंजाबी रंगभूमीचे जनक हरपाल तिवाना यांच्या घरी काम करत करत ‘पंजाब कला मंच’ मध्ये ₹ १५० काम केले.

ओम पुरी तिवाना यांना आपले पहिले गुरू मानत. यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला आणि याच ठिकाणी एक नाट्यमय प्रसंगात नसिरुद्दीन शाह ची ओळख झाली. ती मैत्री आयुष्याच्या अखेर पर्यंत टिकून होती. एन. एस. डी. मधील तीन वर्षे (१९७०-७३) ओम पुरीची एक अभिनेता जडणघडण करण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरली. यानंतर फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे प्रवेश घेतला. त्यावेळी ओम पुरीचा रुममेट होता डेव्हीड धवन की, ज्याने ओम पुरीला विनोदचा अजिबात लवलेश नाही म्हणून खोली बदलून मागीतली होती. पुढे याच डेव्हीड धवन ओम पुरीला कुॅंवारा, दुल्हन हम ले जायेंगे या विनोदी पिक्चर मध्ये काम दिले.

१९७६ ला ओम पुरी मुंबईला राहिला. येथे आल्यावर एका पॅकेजिंग कंपनीसाठी गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेली जाहिरात मिळाली. छोटी मोठी काम करत होता परंतु यामुळे काही भागत नसल्याने अॅक्टर्स स्टुडिओ या अभिनय शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. तेथील ओम पुरीचे विद्यार्थ्यामध्ये अनिल कपूर, गुलशन ग्रोव्हर, मजहर खान इ. होते. हे सगळं सुरू असताना पहिला विजय तेंडुलकर लिखित अन् गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘आक्रोश’ हा पिक्चर मिळाला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला ओम पुरीची ओळख झाली. हिंदी चित्रपटात मुख्य प्रवाहात देखण्या चेहऱ्यांना मागणी जास्त होती. या सगळ्या लाटेत ओम पुरीला भुमिका मिळत होत्या; पण ‘ना धड हिरो, ना व्हिलन, ना काॅमेडियन’. म्हणून त्यावेळी त्यांनी ‘मजमा’ नावाची नाट्यसंस्था निर्माण केली. याचे सदस्य नसिरुद्दीन शाह, रोहिणी हट्टंगडी, करण राझदान,  प्रिया तेंडुलकर होते. या संस्थेने बरीच नाटकं रंगभूमीवर सादर केली.

ओम पुरीला संपूर्ण कारकिर्दीचा शिरोमणी ठरवा अशी एक भूमिका अर्धसत्य या चित्रपटात मिळाली.
या पिक्चरचे पैसे कमी मिळाले परंतु नाव खूप झालं तसेच पहिला उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार सुध्दा मिळाला. खऱ्या अर्थाने ओम पुरी स्टार झाला. या पुस्तकात अर्धसत्य हे प्रकरण खूप त्रोटक आणि अर्धवट लिहिलेल्या सारखं वाटतं राहतं. या पुस्तकात ‘सर्वांचा लाडका’ या ‘प्रकरणात’ ओम पुरीची स्त्रीयांसोबतची ‘प्रकरणं’ त्यांच्या नावानिशी दिली आहेत. अगदी १४ वर्षांचा असताना ५५ वर्ष वयाच्या महिले पासून ते या पुस्तकांची लेखिके पर्यंत सगळी प्रकरणं (सोपा शब्द लफडी) लिहीली आहेत. इथून पुढे या पुस्तकात ओम पुरी कमी अन् नंदिता पुरीच जास्त जाणवते.

‘सिटी ऑफ जाॅय’ हा ओम पुरी चा एक उत्कृष्ट इंग्रजी चित्रपट. याच नावाने या पुस्तकात एक सदर आहे. परंतु जर आपण या पिक्चर विषयी काही लिहिलं असं समजून वाचत असाल तर आपली पार निराशा होईल. यात फक्त या लेखिकेने स्वत:च लग्न अन् आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो अन् तेथे काय झालं, एवढंच लिहिलं आहे. हे सदर वाचत असताना नववी दहावीच्या पोराचा ‘माझी सहल’ या विषयावरचा निबंध तरी बरा असतो असं वाटायला लागतं.

पुढे ओम पुरी चे इंग्लड मध्ये गुडग्याचे ऑपरेशन होतं अन् दोन वर्षे तो घरात कसा रहातो कसा वागतो, चिडचिड कसा करतो, या विषयी काही लिहिलं आहे. काही मोजक्या चित्रपटाविषयी लिहिताना सुध्दा लेखिकेला स्वत: विषयी लिहण्याचा मोह आवरत नाही. या पुस्तकात ओम पुरी ने केलेल्या चित्रपटाची व मालिकेची यादी दिली आहे ती सुद्धा अपूर्ण आहे. शेवटची एवढंच म्हणेन या पुस्तकात ओम पुरी ‘अर्धवट’ समजतो.

दादा कोंडके यांचे आत्मचरित्र ‘एकटा जीव’ किंवा श्रीराम लागूचे ‘लमाण’ हे जसं वाचायला चांगले वाटत. एका लयीत वाटतं तसं ‘अनलाइकली हिरो – ओम पुरी’ हे पुस्तक अजिबात वाटत नाही.

पुस्तक: अनलाइकली हिरो-ओम पुरी
लेखिका: नंदिता सी. पुरी
अनुवाद: अभिजित पेंढारकर
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस

लेखक - रवी निंबाळकर

लेखक हे रवी निंबाळकर हे शिक्षक असून गेले अनेक वर्षे उस्मानाबाद येथे क्लासेस चालवतात. नव्या पिढीला नवी दिशा देण्याचे काम ते करतात. तसेच पुरोगामी चळवळीत पुढाकार घेऊन अनेक सामाजिक कामात कार्यरत आहेत.