‘अंधाराचे बुरुज ढासळतील’ – भूतकाळाची नोंद व भविष्याचा वेध

By Kailas Wadghule 6th April 2020 | 4min Read

आपल्या आवडत्या लेखकाला ऐकायला मिळण ही खरी तर एक पर्वणी असते परंतू देशाच्या किंवा राज्याच्या विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना जे यापूर्वी होऊन गेलेले आहेत त्यांना आपण मुकलेलो असतो. परंतु मग जर त्या त्या ठिकाणी झालेली व्याख्याने पुस्तक रूपाने आपल्याला वाचायला मिळाली तर किती छान. आणि याच प्रकारे मी आत्ता ज्या पुस्तकाची आपल्याला माहिती देतोय ते पुस्तक अंधाराचे बुरुज ढासळतील हे डॉ.आ. ह.साळुंखे सरांच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दहा व्याख्यानांच संकलन पुस्तक रुपात प्रकाशित केले आहे. काही प्रकरणात जाहीर व्याख्याने नाहीत तर सरांनी त्यांचे विविध अनुभवांच्या संदर्भात त्यांच्या मित्रांसोबत जी चर्चा केली त्या संवादाचे लिखित स्वरूपात पुस्तकात अंतर्भूत केलेले आहेत.

या पुस्तकाची सुरुवातच सरांच्या बडोद्याच्या भेटीसंदर्भात जी चर्चा त्यांच्या मित्रांसोबत झाली त्यासंदर्भात आहे. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे त्यांनी आपल्या संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जातात. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक सामाजिक धुरीणांना दिलेला राजाश्रय देखील सर्वश्रुत आहे. परंतु श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी इ.स.1912 मध्ये बडोद्याच्या प्रजेला बुध्दमूर्ती भेट दिली होती. ही मूर्ती बडोद्याच्या ज्युबिली पार्क या उद्यानात बसविण्यात आली आहे आणि या मूर्तीच्या चबूतऱ्यावर काही तपशील संक्षेपाने दिले आहेत त्याची विस्तृत माहिती पुस्तकात मिळते.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्राध्यापकांच्या इतिहास परिषदेत केलेले अध्यक्षीय भाषण इतिहासाचं पुनर्लेखन नव्हे, तर पुन्हा पुन्हा पुनर्लेखन हवं ! या प्रकरणात अतिशय विस्ताराने दिलेलं आहे. ‘केवळ भूतकाळातील घटनांची नोंद करणं, एव्हडच इतिहासाच काम नसतं तर त्याबरोबरच भविष्याचाही वेध घ्यावा’. समाज जितका अधिक परिपक्व, संतुलित, विधायक, प्रयोगशीलतेला स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन देणारा आणि विवेकी असेल तितकं इतिहास लेखन सत्याच्या अधिक जवळ जाते. शेवट करतांना इतिहासाचे निर्मातेही बनू या अस आवाहन करतांना इतिहास घडविणाऱ्या लोकांपैकी बहुतांश लोक स्वतः इतिहास लिहीत नाहीत, हे खरं आहे. परंतू उलट दिशेने पाहता, इतिहास लिहिणारे इतिहास घडवू शकत नाहीत, अस मात्र नाही हे पटवून देतांना इतिहास घडविण्याच्या सामर्थ्याकड त्यांनी लक्ष वेधलं आहे. आपण आपल्या उपजीविकेच्या मर्यादेत न घुटमळता या मर्यादेच्या पलीकडं जाऊन आपल्या समाजाला काही विशेष द्यायला हव, ज्यामुळे समाज अधिक संवेदनशील आणि प्रसन्न होईल, बुद्धीने अधिक स्वतंत्र आणि निमिर्तीप्रधान होईल आणि सामाजिक दृष्ट्या अधिक एकजूट आणि न्यायाभिमुख होईल.. हे आवाहन मला खूप भावलं.

आज ना उद्या, अंधाराच्या गडाचे सर्व बुरुज ढासळणार आहेत. हे पुस्तकाचे शिर्षक असलेल्या प्रकरणात परिवर्तनाच्या संदर्भात सुंदर विवेचन दिले आहे. परिवर्तन ही मानवाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक अशा दोन्ही प्रकारच्या जीवनातील एक मधुर आणि सुंदर प्रक्रिया आहे. शिळं आणि बुरसटलेल, संकुचित आणि श्वास गुदमरून टाकणार असं जे काही असेल, ते सगळं सगळं गळून पडतं, तेव्हा ती परिवर्तनाचीच किमया असते. अशा प्रकारे ही प्रक्रिया उलगडून दिली आहे.

• आपल्या हृदयांच्या गाभाऱ्यात एकमेकांविषयी विश्वास बाळगू या !
• उत्क्रांतीच्या छोट्या पावलांनी महान क्रांतिकडं वाटचाल करु या.
• अंतर्यामीची जिज्ञासा सदैव जागृत ठेवू या !
• तुमच्या शब्दाला तुमच्या काळजाचा स्पर्श असू द्या !
• साहित्याने जग थोडं अधिक सुंदर करावं !
• मुकाट्यानं राहू नये, पण मोकाटही सुटू नये.
• जरासंधाच्या जन्ममृत्यूमधून थोडं तरी शिकूया !

अशा विविध विषयांना हळुवारपणे स्पर्श करणाऱ्या व्याख्यानांची ही मालिका असलेलं हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, त्यावर चिंतन करावे व त्यातून स्वतःच्या विकासासाठी शक्य ते घ्यावे असे आहे.

पुस्तक: अंधाराचे बुरुज ढासळतील
लेखक: डॉ.आ. ह.साळुंखे
प्रकाशक: लोकायत प्रकाशन, सातारा
प्रथमावृत्ती: जून 2008
पुनर्मुद्रण: फेब्रुवारी 2016 (चौथी आवृत्ती)

लेखक - कैलास वडघुले

लेखक हे ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकी येथे ज्युनियर वर्कस् मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. गेली २० वर्षे ते सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. तसेच गड - किल्ले भ्रमंती ही त्यांना फार आवडते. चांगले वाचन व लिखाण ही ते करतात.